Breaking News

कर्जतमध्ये दुसरे भातखरेदी केंद्र सुरू; शेतकरी आनंदले

कर्जत ः बातमीदार

नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीकडून कर्जत तालुक्यातील दुसरे भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनकडून दरवर्षी भाताची हमीभावाने खरेदी केली जाते. दरम्यान, तब्बल दीड महिना उशिरा भाताची हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात झाल्याने नाराज शेतकरी आनंदले आहेत.

नेरळ सोसायटीत कर्जतमधील 30 गावे आणि 11 आदिवासी वाड्यांचा समावेश असून, त्या गावांतील शेतकर्‍यांनी आपल्याकडील भाताची हमीभावाने विक्री करावी, असे आवाहन नेरळ सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या दि महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनकडून हमीभावाने पिकांची खरेदी केली जाते. हमीभावाने भातखरेदी करताना केंद्राच्या नाबार्डकडून हमीभावाने भात विकणार्‍या शेतकर्‍यांना मोबदला व प्रोत्साहन भत्ता दिला जातो. गेली 18 वर्षे ही योजना सुरू असून कर्जतला खरेदी-विक्री संघ व नेरळ तसेच कशेळे येथे विविध विकास कार्यकारी सोसायट्यांकडून भातखरेदी केली जाते. कशेळे परिसरातील आदिवासी शेतकरी लक्षात घेता आदिवासी विकास विभागाकडून भाताची हमीभावाने खरेदी केली जाते. दरवर्षी भातपीक ऑक्टोबरमध्ये शेतकर्‍यांच्या हाती आल्यानंतर मार्केटिंग फेडरेशनकडून नोव्हेंबरमध्ये हमीभावाने भातखरेदी केली जाते. यंदा नेरळ येथील शासकीय गोडाऊनमधील जागेचा प्रश्न प्रलंबित असल्याने हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास उशीर झाला.

400 शेतकरी सभासद असलेल्या नेरळ विविध कार्यकारी सोसायटीमधील हमीभावाने भातखरेदी केंद्राची सुरुवात ज्येष्ठ प्रगत शेतकरी नारायण तरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली, तर त्याआधी महिला संचालक पौर्णिमा राऊत यांनी भाताने भरलेल्या गोणीचे व वजन काट्याचे पूजन केले. या वेळी नेरळ विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र हजारे, संचालक व सचिव विष्णू कालेकर, संचालक सुहास भगत, सावळाराम जाधव, मधुकर गवळी, सीताराम गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते यांनी सोसायटीत आधी सभासद असलेल्या व सोसायटी क्षेत्रात असलेल्या शेतकर्‍यांच्या भाताची खरेदी करावी, अशी सूचना केली. संचालक सचिव विष्णू कालेकर यांनी आपल्याकडील गोडाऊनमध्ये 7500 क्विंटल भात साठवणुकीची क्षमता असून त्यासाठी शासनाकडून नेरळ सोसायटीला 25000 गोण्या मिळणे आवश्यक आहे. सध्या केवळ 5000 गोण्या उपलब्ध असल्याची माहिती दिली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply