कल्याण : प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांची उणीधुणी काढताना दिसतात. त्यावरून बरीच चर्चा रंगते. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरून ठाकरे सरकारला घरचा अहेर दिला आहे. कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमध्ये आले होते. या वेळी त्यांनी कल्याणमधील रस्त्यांबाबत भाष्य केले. कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही. तरुणांनी काहीतरी विचार केला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कुठेही नसतील, अशी टीका आव्हाड यांनी केली. जितेंद्र आव्हाडांनी ज्या वेळी कल्याणमधील रस्त्यांविषयी भाष्य केले, त्या वेळी कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हेही व्यासपीठावर उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्याने चर्चा रंगू लागली आहे.
महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र की स्वतंत्र?
येत्या काही महिन्यांत कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये आव्हाड यांनी महाविकास आघाडीविषयी बोलताना येणार्या काळात काय होईल हे सांगता येत नाही, परंतु आता तरी ते आपले मित्र असल्याने त्यांच्यावर टीका करता येत नाही. येणारा काळ अवघड असून, युती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तयारी कायम ठेवा, असे म्हटले होते. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत आघाडी होणार की तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.