Breaking News

…तर सिडकोची कामे बंद पाडू!; पनवेलमधील कोल्ही कोपरच्या भूमिपुत्रांचा इशारा

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पिकती सुपीक जमीन व सुस्थितीत असलेली घरेदारे सिडकोला तुटपुंज्या दरात बहाल केल्यानंतर सिडकोने ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे कोल्ही कोपर ग्रामस्थ आक्रमक झाले असून या विभागातील सिडकोची सर्व विकासकामे बंद करू, असा इशारा भूमिपुत्रांनी पत्रकार बुधवारी (दि. 22) परिषदेत दिला. साडेबावीस टक्के जमीन देण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष साडेबारा टक्केच जमीन देऊन दहा टक्के मोबदला देण्याचे ठरविण्यात आले होते, मात्र साडेबारा टक्के जमीन मिळण्याऐवजी पावणेआठ टक्केच जमीन भूमिपुत्रांच्या वाट्याला आली असून सिडकोने भूमिपुत्रांची घोर फसवणूक केली आहे. या संदर्भात बुधवारी कोल्ही-कोपर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात भूमिपुत्रांनी आपल्या झालेल्या फसवणुकीचा पाढाच वाचला. गाव कमिटीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिडकोच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला गेला. या संदर्भात सिडकोविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याही निर्धार या वेळी करण्यात आला. येथील प्रकल्पबाधित गाव कमिटीने सांगितले की, आमची घरे उठविल्यानंतर आम्हाला 19 महिन्यांचे घरभाडे देण्याचे सिडकोने मान्य केले होते, मात्र प्रत्यक्षात 12 महिन्यांचेच घरभाडे देण्यात आले असून आज साडेचार वर्षे उलटूनही अनेक प्रकल्पग्रस्त भाड्याच्या घरातच राहत आहेत. या संदर्भात सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व पत्रव्यवहार करूनसुद्धा सिडको आम्हा भूमिपुत्रांना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. देवस्थानच्या भूखंडाच्या नावाखाली आमच्या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचा बराच हिस्सा सिडकोकडून लाटला गेला आहे. याबाबत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अर्ज केला असता, या कार्यालयातून श्री लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट मु. कोल्ही, ता. पनवेल, जि. रायगड या नावाने कोणतीही नोंद नसल्याचे लेखी पत्र आम्हाला देण्यात आलेले आहे. तरीही सिडकोच्या कागदोपत्री या ट्रस्टची नोंद करण्यात आली आहे. आमचे गाव यापूर्वी पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत होते, मात्र आता गावाची अनेक ठिकाणी विभागणी झाल्यामुळे आमच्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. गावातील प्रमिला प्रभाकर नाईक व बेबी काशिनाथ भोईर यांची घरे सिडकोने तोडली असून त्यांना नुकसानभरपाई अगर मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे ही दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली असून सध्या भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत, अशी माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली. या पत्रकार परिषदेला पंच कमिटीचे मोहन नाईक, धनराज भोईर, सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, मनखुश नाईक, जनार्दन करावकर, बाळराम नाईक, महेंद्र नाईक, राहुल नाईक, तान्हाजी भोईर, हृषिकेश भोईर, गंगाराम नाईक, कृष्णा नाईक, प्रल्हाद नाईक, बबन घरत, राम पाटील, कृष्णा भोईर, अमृत भोईर, मधुकर भोईर, प्रभाकर नाईक, हरिभाऊ नाईक, काशिनाथ भोईर, रोहिदास पाटील, शंकर डोंगरे आदी उपस्थित होते.

आश्वासने हवेत विरली

सिडकोकडे गावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली असता, त्या मागणीलासुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असून मैदानासाठी राखीव असलेला भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्यात आलेला आहे तसेच सिडकोने अनेक नागरी सोयी सुविधा देण्यासंदर्भात आम्हाला आश्वासने दिली होती, परंतु त्याचीसुद्धा आजमितीस पूर्तता झाली नाही. आमचे गाव नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित झाल्याने वडघर, करंजाडे, पुष्पकनगर नोड येथे जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या गावचे नावच नकाशावरून पुसले गेले आहे. त्यामुळे आमच्या गावाची ओळख कायम राहण्यासाठी या विभागाला गावाची मूळ नावे देण्यात यावीत, अशी आग्रही मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply