ऋषभ पंतची मोठी झेप
दुबई : वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत स्फोटक फलंदाजी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे, तर विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांच्या क्रमवारीत घरसण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आणि इंग्लंडचा जो रुट यांना क्रमवारीत बढती मिळाली आहे.
सिडनी कसोटीपूर्वी ऋषभ पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत 45व्या स्थानावर होता. त्याने तिसर्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 36 आणि दुसर्या डावात 97 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. या खेळीचा फायदा पंतला झाला आहे. तिसर्या कसोटीनंतर 26व्या क्रमांकावर पंत पोहचला होता. त्यानंतर निर्णायक चौथ्या कसोटी सामन्यात 89 धावांची खेळी केल्यामुळे 13 अंकांचा फायदा झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार ऋषभ पंत 13व्या क्रमांकावर आला आहे. पंतची ही आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे. दौर्याच्या सुरुवातीला संघात स्थानही मिळवले नव्हते, पण दुसर्या कसोटीनंतर भरारी घेतली. आयसीसीच्या क्रमवारीवर नजर फिरवल्यास अव्वल 15 फलंदाजांमध्ये पंत वगळता एकही यष्टीरक्षक नाही.
भारताच्या इतर फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास अजिंक्य राहणे आणि विराट कोहली यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. विराट कोहली तिसर्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे, तर रहाणे सातव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत एका अंकाने सुधारणा झाली आहे. पुजारा ताज्या क्रमवारीनुसार सातव्या स्थानावर विराजमान आहे. शुबमन गिल 47व्या क्रमांकावर आहे. अव्वल 10 फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर केन विल्यमसन असून, दुसर्या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे. तिसर्या क्रमांकावर मार्नस लाबुशेन आहे. श्रीलंकेविरोधात द्विशतकी खेळी करणार्या जो रुटला सहा स्थानांची बढती मिळाली आहे. रुट सध्या पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह आणि अश्विन यांची एका स्थानाने प्रगती झाली आहे. बुमराह नवव्या, तर अश्विन आठव्या स्थानावर विराजमान आहे. पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा तिसर्या आणि अश्विन सहाव्या क्रमांकावर आहे.