Breaking News

सलग सुट्ट्यांची संधी साधत शहरवासीयांची पर्यटनस्थळांकडे धाव

पनवेल : बातमीदार

लॉकडाऊनमध्ये सहा महिने घरात कोंढून बसलेले शहरवासीय तीन दिवसांच्या सुट्ट्यांची संधी साधत घराबाहेर पडले असून त्यांनी शेतघरांसह नजीकच्या पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. रविवारी सकाळपासून मुंबईजवळची लोणावळा, खंडाळा, माथेरान, अलिबाग ही पर्यटन स्थळे, तर पनवेल, कर्जत, मुरबाड, शहापूर येथील शेतघरांकडे कुटुंबासह जात असल्याचे दृश्य होते. त्यामुळे शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर, शिळ फाटा, मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी दिसून आली.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील अनेक श्रीमंतांची मुरबाड, शहापूर, कर्जत, अलिबाग, पनवेल या भागांत शेतघरे (फार्म हाऊस) आहेत. गेले सहा महिने ही शेतघरे ओस पडली होती.  मुंबई महानगर प्रदेशातील ही शेतघरे शुक्रवारपासून पुन्हा गजबजलेली दिसून आली. स्वत:ची शेतघरे नसलेल्या अथवा छोट्या पर्यटनाची इच्छा असलेल्यांनी लोणावळा, खंडाळा, अलिबाग, माथेरान या पर्यटन स्थळांना पसंती दिली असून ऑनलाइन हॉटेल्स आरक्षण केले आहे. त्यामुळे या पर्यटन स्थळांवरील हॉटेल्स, भाड्याने देण्यात येणारे बंगले शुक्रवार ते सोमवापर्यंत हाऊसफुल्ल असल्याचे चित्र आहे.

गेले सहा महिने घरात बसून कंटाळलेली मुले, महिला, नोकरदारांनी शुक्रवारी सकाळपासून शहराबाहेर सीमोल्लंघन केल्याचे चित्र होते. त्यामुळे मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, शीव-पनवेल, शिळ फाटा या मार्गावर शहरांबाहेर पडणार्‍या वाहनांची चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून येत होते. घराबाहेर पडताना कोरोनापासून बचाव करता यावा म्हणून मुखपट्टी, जंतुनाशके, आदी काळजी घेतली जात होती. त्यामुळे अनेक वाहनांमध्ये संपूर्ण कुटुंब मुखपट्टी लावून गाडीत बसले असल्याचे चित्र होते. सामाजिक अंतराचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र होते. पहिल्या तीन महिन्यांत असलेली कोरोनाची भीती आता मात्र कमी झाल्याचे दिसून येत होते.

मुंबई महानगर प्रदेशात वाढणारी रुग्णसंख्या पाहता अनेक जणांनी यापूर्वीच गाव गाठले आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणार्‍यांची संख्या मागील काही दिवसांत वाढली आहे. मात्र शुक्रवारपासून लागलेल्या सुटीमुळे तीन दिवस आऊटिंग करणार्‍यांचा ओघ जास्त असल्याचे दिसून येत आहे.

-सुनील लोखंडे, उपायुक्त (वाहतूक), नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply