Breaking News

सिडको देणार हज समितीला खारघरचा भूखंड

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-38 मधील भूखंड क्र. 1ए भारतीय हज समितीला हज हाउस आणि हंगामी कार्यालयाच्या उभारणीसाठी वाटपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर हा भूखंड असल्याने हज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंना याचा निश्चितच फायदा होणार आहे.

मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाच्या असणार्‍या हज यात्रेसाठी जगभरातील लक्षावधी मुस्लीम बांधव सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना शहरांना भेट देण्यासाठी जातात. 1927 पासून भारतातील हज यात्रेकरूंसाठी या यात्रेची व्यवस्था करण्यासह तत्संबंधी इतर प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम भारतीय हज समिती करत असून ही समिती भारतीय संसदेने केलेल्या अधिनियमांतर्गत स्थापन झालेली वैधानिक संस्था आहे. भारतातील हज यात्रेकरूंसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यासह राज्यांतील/केंद्रशासित प्रदेशांतील हज समित्यांबरोबर समन्वय साधण्याचे अधिकार भारतीय हज समितीला आहेत. सन 2016 पासून हज यात्रेसंबंधीचे कामकाज भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडे सोपविण्यात आले आहे.

अल्पसंख्याक मंत्रालयाकडून भारतीय हज समितीच्या हज हाउस तसेच हंगामी कार्यालयाच्या उभारण्यासाठी शक्यतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील भूखंड देण्यात यावा याबाबतची विनंती करणारे पत्र सिडकोला प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-38 मधील सहा हजार चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड क्र. 1ए भारतीय हज समितीला भाडेपट्ट्याने 14 कोटी 21 लाख 94 हजार रुपये भाडेपट्टा अधिमूल्य आकारून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply