अलिबाग ः प्रतिनिधी
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उरण तालुक्यातील भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघाने एसबीसी महाड संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फलंदाज जिग्नेश म्हात्रे व जलदगती गोलंदाज कर्णराज देशमुख यांच्या झुंझार खेळाच्या जोरावर भेंडखळ संघाने महाडवर 53 धावांनी दिमाखात विजय मिळविला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भेंडखळ संघाने 40 षटकांमध्ये सात गडी गमावत 189 धावा फलकावर लावल्या होत्या. जिग्नेश म्हात्रेने दमदार 80 धावा केल्या, तर कर्णराज देशमुखने उपयुक्त 33 धावांची खेळी केली आहे. एसबीसी महाड संघाकडून आरुष कोल्हे व आर्यन डोंगले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रतिउत्तर देताना महाड संघ सर्व गडी गमावत 136 धावाच करू शकला. सलामीला आलेल्या आरुष कोल्हे याने तडाखेबंद फलंदाजी करीत 62 चेंडूंमध्ये 69 धावा ठोकल्या, मात्र आरुष बाद झाल्यानंतर सामना भेंडखळ संघाकडे झुकला. कर्णराज देशमुख याने सहा, तर प्रणिकेत पाटील याने चार फलंदाज बाद केले. अष्टपैलू खेळी करणार्या कर्णराजला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. महाड संघाचा पराभव झाला असला तरी तो स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाला व प्रत्येक खेळाडूला शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील पाटील यांच्याकडून आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, अजय टेमकर डॉ. भूषण पाटील, डॉ. कोल्हे, आवेष चिचकर, शरद म्हात्रे, संकेश ढोळे, आदेश नाईक उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …