भाजपच्या माजी नगरसेविका रुपाली भगत यांची मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
प्रभाग 96 मधील डेब्रिजचे व कचर्याचे ढिगारे हटविण्याची तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना कचर्याचे डब्बे वितरीत करण्याची, स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी करण्याची तसेच विभागात पाहणी अभियान राबविण्याची मागणी प्रभाग 96 मधील भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांनी नेरूळ विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकारी यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रभाग 96 मध्ये नेरूळ सेक्टर 16, 16ए आणि 18 या परिसराचा समावेश होत आहे. प्रभागाला शहरी भागात प्रथम क्रमाकांचा स्वच्छतेचा पुरस्कारही नुकताच मिळालेला आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळणार्या प्रभागात मोकळ्या भुखंडावर डेब्रिजचे व कचर्याचे ढिगारे असणे ही बाब महापालिका प्रशासनासाठी व स्थानिक रहीवाशांसाठी भूषणावह नसल्याचे सांगत रूपाली भगत यांनी विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देताना नाराजी व्यक्त केली आहे.
प्रभागात सेक्टर 16ए भुखंड क्रं. 122 शेजारी, सेक्टर 16 ए परिमल गृहनिर्माण सोसायटीसमोरील मोकळ्या भुखंडावर डेब्रिजचे ढिगारे पडलेले आहेत. प्रभागातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे कचर्याचे डब्बेही तुटलेले आहेत. त्यामुळे सोसायटी आवारात कचरा संकलन करताना तसेच सोसायटीतून कचरा वाहक गाडीपर्यंत कचरा वाहून नेताना कचरा विखुरला जातो. त्यामुळे सोसायटीतील आवार व सोसायटीबाहेरील रस्तावर दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत प्रभागातील उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींना रंगरंगोटी अजून बाकी आहे. ती त्वरीत पूर्ण करण्यात यावी. प्रभागातील समस्यांची पाहणी करण्यासाठी पाहणी अभियान राबवावे, जेणेकरून समस्यांची कल्पना येईल व समस्या निवारणासाठी आम्ही सतत करत असलेल्या पाठपुराव्याचेही गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल, असे या वेळी भगत यांनी सांगितले.