चंदिगड : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया दौर्यात अनेक युवा चेहर्यांनी आपली छाप उमटवली. त्यापैकीच एक आहे शुबमन गिल. मेलबर्न कसोटीत नॅथन लायनची फिरकी गोलंदाजी असो किंवा गाबामध्ये मिचेल स्टार्कचा भेदक मारा शुबमनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सहजतेने सामना केला. त्यामुळे शुबमनच्या फलंदाजी तंत्राचे दिग्गज कौतुक करीत आहेत. या यशाचे श्रेय त्याने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला दिले आहे. तो एका वृत्तसमूहाशी बोलत होता.
बॉर्डर-गावसकर मालिकेत सहा डावांमध्ये फलंदाजी करण्याची शुबमनला संधी मिळाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना एकदाही त्याच्या चेहर्यावर दबाव दिसला नाही. ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या डावात त्याने केलेली 91 धावांची खेळी भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयात महत्त्वाची ठरली.
शुबमनने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाचे श्रेय युवराज सिंगलाही दिले आहे. आयपीएलच्या आधी 21 दिवसांचे एक शिबिर झाले. त्यात युवराजने कसून सराव करून घेतला. युवराजने वेगवेगळ्या अँगलमधून शेकडो शॉर्टपीच चेंडू टाकले. त्याचा मला ऑस्ट्रेलियात फायदा झाला, असे शुबमन म्हणाला.
संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारा शुबमन म्हणतो की, आता मी रिलॅक्स आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी पदापर्ण करणे ही माझ्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. मी आधी बेचैन होतो, पण प्रत्येक डावाबरोबर माझा आत्मविश्वास वाढत गेला.
शतक झळकवण्याची संधी हुकल्याच्या वडिलांच्या मताशी तो सहमत आहे. शतक हे केकवरच्या चेरीप्रमाणे आहे. मी सेट झालो होतो. त्यामुळे शतक झळकवायला पाहिजे होते, पण त्याचवेळी संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद आहे. शिकण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी ही खूप मोठी मालिका आहे, असे शुबमन म्हणाला.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …