Breaking News

कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबईत 4,836 बेड झाले रिकामे

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई शहरात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. विविध रुग्णालयांमधील 5965 पैकी तब्बल 4836 बेड रिकामे आहेत. 11 रुग्णालयांमध्ये एकही रुग्ण नाही. महानगरपालिकेच्या 1200 बेडची सुविधा असलेल्या

सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये फक्त 156 रुग्ण उपचार घेत असून उर्वरित सर्व बेड रिकामे आहेत.

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रेडझोन असलेल्या विभागांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होता. झपाट्याने रुग्ण वाढू लागल्यामुळे शहरातील रुग्णालयीन यंत्रणा कोलमडली होती. रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध होत नव्हती. यामुळे महानगरपालिकेने नवीन कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यास सुरुवात केली. याशिवाय खासगी रुग्णालयांचाही आधार घेतला. शहरात तब्बल 5965 बेड उपलब्धता करण्यात आली. परंतु डिसेंबर अखेरपासूनच कोरोनाची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

महानगरपालिकेने आतापर्यंत चार लाख 76 हजार 797 नागरिकांची कोरोना तपासणी केली आहे. आतापर्यंत सहा लाख 45 हजार 482 जणांना क्वॉरंटाइन पूर्ण झाले आहे. आता 8124 जणांचेच क्वारंटाइन सुरु आहे. इंदिरानगर परिसरात रुग्ण संख्या शून्यावर आली असून तीन दिवस नवीन रुग्ण वाढला नाही. दिघा, कातकरीपाडा व इतर अनेक विभागांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

सद्यस्थितीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 806 वर आली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे मनपाने 13 पैकी 12 उपचार केंद्रे बंद केली आहेत. सिडको एक्झिबिशन केंद्र सुरु ठेवले आहे. या केंद्रामध्ये 1200 बेडची व्यवस्था केली आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये फक्त 156 रुग्णच त्या ठिकाणी उपचार घेत आहेत.

उपचाराधीन रुग्ण झाले कमी

शहरातील सर्व केंद्रांमध्ये मिळून फक्त 915 जण उपचार घेत आहेत. यामध्येही पनवेल व इतर परिसरातून येणार्‍या रुग्णांचाही समावेश आहे. खासगी रुग्णालयांमधील रुग्ण संख्याही कमी झाली आहे. सद्यस्थितीमध्ये 11 रुग्णालयांत एकही रुग्ण नाही. सात ठिकाणी 10 पेक्षा कमी रुग्ण आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply