मुंबई संघातून वगळल्यानंतर मोठा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी 2023मधील पर्वात मुंबई इंडियन्स संघाचा सर्वांत अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड वगळणार असल्याची चर्चा सुरू असताना वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूनेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.
आयपीएल 2023साठी मिनी ऑक्शन होणार आहे आणि 15 नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. या ऑक्शनआधी किरॉन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबई संघ त्याला आगामी हंगामातून वगळणार असल्याची चर्चा होती. पोलार्डने मुंबईकडून 189 सामन्यांत 3412 धावा केल्या आणि 69 विकेट्स घेतल्या आहेत.
निवृत्तीबाबत पोलार्डने ट्वीट करून म्हटले की, हा निर्णय माझ्यासाठी घेणे सोपे नव्हते. मला आणखी काही वर्ष खेळायची होती, परंतु मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या फ्रँचायझीसोबतचा प्रवास अविश्वसनीय होता आणि मी बरेच काही साध्य केले. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध मी खेळू शकत नाही.
पोलार्ड पुढे म्हणाला, आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघासोबत 13 वर्ष खेळायला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, पण आता एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करणार आहे. स्टेडियममधील तो आवाज, जयघोषाचा तो नारा, सर्व काही. आम्ही एकत्र मिळून 2011 व 2013ची चॅमियन्स ट्रॉफी जिंकली आणि 2013, 2015, 2017, 2019 व 2020मध्ये आयपीएल जेतेपद जिंकले.
मुंबई इंडियन्सला गुडबाय बोलताना खूप दुःख होतंय, पण मी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्यास तयार आहे आणि मुंबई इंडियन्स एमिरेट्सकडून खेळणार आहे. हा नवा चॅप्टर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे.
-किरॉन पोलार्ड