Breaking News

नागोठणे ग्रामपंचायतीची धडक कारवाई

इमारतीचा पाणीपुरवठा केला तात्पुरता बंद

नागोठणे : प्रतिनिधी : पाण्याच्या उधळपट्टीबद्दल वारंवार सूचना देऊनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्‍या नागोठण्यातील एका इमारतीचा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीने तात्पुरता बंद करण्याचा निर्णय  घेतला असून, दंडाची रक्कम भरल्यानंतरच या इमारतीचा पाणीपुरवठा पूर्ववत चालू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

नागोठण्यातील प्रभुआळीमधील गांधी चौकात एक इमारत बांधण्यात आली असून, अनेक नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर असणार्‍या टाकीत ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. खालील टाकीतील पाणी पंपाद्वारे वरील टाकीत चढविण्यात येते, मात्र पंप चालू केल्यानंतर टाकी पूर्ण भरल्यावर पंप बंद करण्याची तसदी या इमारतीमधील रहिवासी घेत नसल्याने टाकीतून ओव्हरफ्लो झालेले हजारो लिटर पाणी खाली सोडलेल्या पाईपद्वारे रस्त्यावर वाहून जात असते. अनेकदा सूचना देऊनही सदनिकाधारक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले असतानाच सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना गुरुवारी (दि. 4) दुपारी हा प्रकार पुन्हा झाला असल्याचे आढळून आले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना तेथे पाचारण करून आपल्या अधिकारात इमारतीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला.

पाण्याच्या अपव्ययाबाबत अनेकदा सूचना देऊनही सदनिकाधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. सदनिकाधारकांनी दंडाची रक्कम भरल्यानंतरच हा पाणीपुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल.

-डॉ. मिलिंद धात्रक, सरपंच, नागोठणे

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply