पनवेल : रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल मेट्रो यांच्या वतीने एम. जी. जोशी मास्तर स्मृती खुल्या नाट्यसंगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील चिंतामणी सभागृहामधे झालेल्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याचबरोबर रसिकांनाही दर्जेदार नाट्यगीत श्रवणाचा आनंद मिळाला.
अत्यंत श्रवणीय व रंगतदार अशा या स्पर्धेमध्ये नेहा पुरोहित हिने प्रथम क्रमांक, सई पाटील हिने द्वितीय, नीलेश म्हात्रे याने तृतीय, तर स्नेहल नाईक हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
सुप्रसिद्ध संगीतनाट्य अभिनेत्री व गायिका नीलाक्षी पेंढारकर व गायत्री शिधये, कोल्हटकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. केदार भागवत व सुहास चितळे या नामांकित वादकांनी स्पर्धकांना संगीतसाथ केली. अपर्णा वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
रोटरी क्लब, पनवेलचे अध्यक्ष अवधूत वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. परीक्षक नीलाक्षी पेंढारकर यांनी या आयोजनाबद्दल रोटरी क्लबची प्रशंसा केली. संगीत नाटके रंगभूमीवर फारशी येत नसली, तरी तरुण वर्ग नाट्यसंगीताकडे वळतोय याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. परीक्षक गायत्री शिधये, कोल्हटकर यांनीही स्पर्धकांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मेट्रोचे अध्यक्ष अवधूत वैद्य, प्रोजेक्ट चेअरमन मनीष कुलकर्णी, सचिव रामदास हिंगमिरे, क्लब अॅडमिन राजेंद्र कोशे, संजय पाटील, मोहन महाजन, अजित भावे आदी सभासदांनी मोलाचे योगदान दिले.