Breaking News

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात

अलिबाग ः जिमाका

मतदान करणे आपले कर्तव्य आहे. मतदान करताना आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करून लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी (दि. 25) येथे केले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हा नियोजन सभागृह येथे कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, भारत निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या नवनवीन सुविधा बनविल्या त्या सुविधांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करावा. दिव्यांग व्यक्ती व वय वर्षे 80 वरील मतदारांसाठी पोस्टल व्यवस्था व इतर अनेक सुविधा देण्याचेही भारत निवडणूक आयोग प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारतातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. कारागृहातील कैद्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. नवमतदारांनी घरातील नागरिकांची नावे मतदार यादीत आहेत किंवा नाहीत हे तपासून घ्यावे. तसेच मतदानाच्या वेळी मतदान करण्यासाठी त्यांना आग्रह करावा, असे सांगून ज्यांचे मतदार यादीत नाव नसेल अशा नागरिकांनी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तसेच तालुक्यातील संबंधित निवडणूक अधिकार्‍यांशी संपर्क साधून मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी चौधरी यांनी उपस्थितांना केले.

या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते नवीन मतदार यादीत नोंदणी झालेल्या सोनाली मिश्रा, चेंढरे-अलिबाग, श्रद्धा थळे, चेंढरे-अलिबाग, भाविका नवखंडे, अलिबाग, साक्षी मिश्रा, चेंढरे अलिबाग, संचिता जायनाखवा, वरसोली, अलिबाग या नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करणार्‍या पी. एस. भायदे, विकास पाटील, समीर शेडगे, विष्णू पोसणे, अमोल करंदेकर तसेच उत्कृष्ट डेटा एण्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणार्‍या संकेत सुकले, रूपेश म्हात्रे, सचिन नागोठणेकर, सुनील काळे, हर्षद राऊत, ममतेश पाटील, सुमित कांबळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदार जनजागृतीसाठी अलिबाग शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली होती. प्रभात फेरीस विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुरूड ः प्रतिनिधी 

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघांतर्गत मुरूड तालुक्यात 11वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूडतर्फे तालुका स्तरावर सोमवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उठा जागे व्हा, मतदान करा जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चला मतदान करू या, लोकशाही मजबूत करू या, मतदानाचा अमूल्य अधिकार बजावणे तुमचा हक्क आहे, मतदान करणे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन  तहसीलदार गमन गावित यांनी केले.

साक्षरता क्लबच्या अंतर्गत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत मतदार जनजागृती समिती स्थापन करून कार्यालयप्रमुखांना नोडल ऑफीसर करण्यात आले आहे. नवमतदारांकरिता मुरूड तालुक्यातील दोन महाविद्यालयांत नवमतदार समिती स्थापन करण्यात आली आहे. महाविद्यालयातील ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही अशा विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करून घेण्यात आली. माध्यमिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी तालुक्यातील 19 हायस्कूलमध्ये नवीन मतदार समिती स्थापन करण्यात आला. त्या विद्यार्थ्यांना मतदान, इव्हीम मशिन तसेच लोकशाहीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. मुरूड तालुक्यात 62 मतदान केंद्रांवर निवडणूक शाळा स्थापन करण्यात आली असून आदिवासी लोकांमध्ये मतदार नोंदणी व मतदान जनजागृती करण्यात आली. मुरूड तालुक्यात विविध ठिकाणी या दिनानिमित्त रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या वेळी मुरूड तहसीलदार गमन गावित, नायब तहसीलदार रवींद्र सानप, गोविंद कोटंबे, संतोष पवार, केतन भगत, मयुरेश गद्रे, संदेश वाळंज आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply