मुंबई : प्रतिनिधी
नव्या शेतकरी कायद्यांच्याविरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या हजारो शेतकर्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले, मात्र हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नव्हती, असेही आठवले म्हणाले. मुंबईतील शेतकरी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर एका वृत्तावाहिनीशी बोलताना आठवले यांनी हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले. केंद्र सरकारने कायदे केले असून, ते मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकर्यांनी आता आंदोलन थांबवायला हवे, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेही सध्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे तसेच केंद्र सरकारनेही दोन वर्षांसाठी हे कायदे लागू न करण्याचा प्रस्ताव शेतकर्यांसमोर ठेवला आहे. याच दोन गोष्टींचा संदर्भ देत आठवलेंनी हे आंदोलन केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी करण्यात आले आहे, असा टोला केंद्र सरकारला विरोध करणार्या राजकीय पक्षांचे नाव न घेता लगावला. केंद्र सरकार हे शेतकर्यांच्या भल्याचा विचार करीत असून, त्यांना न्याय मिळून देण्यासाठी काम करीत असल्याचेही आठवलेंनी म्हटले आहे.
राज्यपालांविषयी राजभवनाकडून स्पष्टीकरण
मुंबई : सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात सोमवारी (दि. 25) मुंबईतील आझाद मैदानावर शेतकर्यांचे आंदोलन झाले. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकर्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार होते, मात्र राज्यपाल राजभवानात उपस्थित नव्हते. त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. यावर राजभवनातून स्पष्टीकरण समोर आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. ते सोमवारी गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना 22 जानेवारी रोजी दूरध्वनीव्दारे तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना 24 जानेवारीला पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेविषयी कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉट्सअॅप संदेशाव्दारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे.