Breaking News

पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी

पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 21) येथे केली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी करून त्यांनी लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समवेत आमदार सुजित मिणचेकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, पी. डी. पाटील, अजितसिंह काटकर, तहसीलदार सुधाकर भोसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

निलेवाडी गाव 100 टक्के पूरग्रस्त असून संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. निलेवाडी गावकर्‍यांना सरकारी अथवा खासगी जागा गावकर्‍यांच्या सहकार्याने उपलब्ध करून घेऊन त्यांना नवीन ठिकाणी घरे बांधून दिली जातील, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले की, निलेवाडी गावात महसूल अथवा गायरान जागा शोधून त्या ठिकाणी गावाचे पुनर्वसन केले जाईल. सरकारी जागा उपलब्ध न झाल्यास खासगी जागा उपलब्ध करून घेण्याचेही प्रयत्न केले जातील.

पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांसाठी अडीच लाख रुपये, तर शहरातील घरांसाठी साडेतीन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, पुराच्या पाण्याने पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच सध्या संपूर्ण घर पडलेल्या कुटुंबांना एक वर्षाकरिता दर महिन्याला दोन हजार याप्रमाणे 24 हजार रुपयांचे भाडे शासनामार्फत दिले जाईल. बचत गटातील महिलांनी बँकेकडून कर्ज काढून उभ्या केलेल्या व्यवसायाचे नुकसान झाले असेल, तर त्याचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.

शासन आणि प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार लाख 13 हजार लोकांना

सुरक्षितस्थळी हलवून त्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. टप्प्याटप्प्याने सर्व मदत उपलब्ध केली जात आहे. पाण्याखाली गेलेल्या शेतीसाठी एक हेक्टरची पीक कर्जमाफी आणि ज्यांनी कर्ज घेतले नाही त्यांना उत्पन्नाच्या तिप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गोठा बांधण्यासाठी तीन हजारांची मदतही शासनाने जाहीर केली आहे.

काळजी करू नका. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा देऊन पालकमंत्री म्हणाले की, पूरग्रस्तांसाठी जे-जे करावे लागेल ते निश्चितपणे केले जाईल. पुरामुळे पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच बुडालेल्या शेतीसाठीही पीक कर्ज माफ, विद्यार्थांना मोफत पुस्तके देणे, मुलींना एसटी प्रवास मोफत अशा सर्व बाबींवर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. निलेवाडी गावासाठी वारणा नदीवर ऐतवडे-निलेवाडी असा पूल बांधण्यासाठी तत्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही चंद्रकांत पाटील यांनी दिले. पुरामुळे खराब झालेल्या पुलांच्या उभारणीचे काम प्राधान्याने हाती घ्या. यासाठी तीन दिवसांचे टेंडर काढण्यास शासनाने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले. भेंडवडेत पूरग्रस्तांसाठी मदत किटचे, पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी ओल्या चार्‍याचे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पालकमंत्री  पाटील यांनी खोची गावाला भेट देऊन पूरग्रस्तांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.

महिलांकडून समाधान व्यक्त

पूरग्रस्त निलेवाडी गावातील महिलांनी प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी वेळेवर केलेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त केले. लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, तसेच पूरग्रस्त कुटुंबांना रोख स्वरूपाचे पाच हजार रुपयांचे अनुदान व 20 किलो धान्य तत्काळ दिल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. या परिसरातील पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी पालकमंत्री पाटील यांनी पूर कालावधीत स्वखर्चाने चारा उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली. त्याबद्दलही गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply