Breaking News

पनवेल परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरातील खारघर, कळंबोली, कामोठे, जुने पनवेल, नवीन पनवेल, पनवेल रेल्वे स्थानक या परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. खारघर वसाहतीत चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशनमध्ये दररोज चोरीच्या घटनांची नोंद होत असते.

यामध्ये खारघर वसाहतीत लाख रुपये किंमतीच्या ग्रे रंगाच्या निस्सान कंपनीच्या सनी या कारची ज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. दिनकर नलावडे यांनी त्यांची निस्सान कंपनीच्या सनी (गाडी क्र. एमएच 02 सीआर 1923) ही स्वप्नपूर्ती सोसायटी, से.-36, खारघर येथील सोसायटीच्या पार्कींगमध्ये उभी करून ठेवली होती. या वेळी अज्ञात चोरट्यांनी ही गाडी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

खारघर वसाहतीत उभ्या असलेल्या गाडीच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी महागड्या लॅपटॉपसह इतर वस्तूंची चोरी केली आहे. रिलायन्स डिजीटलच्यासमोर हर्षवर्धन करणानी यांनी त्यांची महिंद्रा एक्सयूव्ही गाडी उभी ठेवली होती. या वेळी चोरट्यांनी गाडीच्या उजव्या बाजूकडील पाठीमागील दरवाजाच्या काचा फोडून महागडे लॅपटॉपसह इतर वस्तू असा मिळून जवळपास 40 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

700 किलो वजनाच्या लोखंडी सळ्यांची चोरी झाल्याची घटना खारघर वसाहतीत घडली आहे. जयवेंद्र सिंग यांच्या सेक्टर-39 ए, रूद्र पॅलेस या बिल्डींगचे बांधकाम चालू असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या 700 किलो वजनाच्या लोखंडी सळ्या ज्याची बाजारी किंमत 38 हजार 500 रुपये इतकी आहे. या सळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पनवेल रेल्वे स्टेशन जवळील रिक्षा स्टँड परिसरात उभी करून ठेवलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. स्वप्निल सहस्त्रबुद्धे यांनी त्यांची 10 हजार 800 रूपये किंमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची मोटरसायकल पनवेल रेल्वे स्टेशन जवळील रिक्षा स्टँड परिसरात उभी करून ठेवली होती. या वेळी ही मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांकडून सर्तक राहण्याचे आवाहन

कोरोना महामारीत लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. जलदरित्या पैसे मिळविण्यासाठी चोरी, लूटमार करणार्‍यांचे प्रमाण वाढले. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply