खेळाडूंसाठी दरवाजे बंद
अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे बांधण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर खेळण्यापेक्षा इतर कामांसाठीच जास्त केला जात आहे. सध्या हे क्रीडा संकुल कच्च्या कैद्यांसाठी तात्पुरते जेल म्हणून वापरले जात आहे. परिणामी खेळाडूंसाठी या संकुलाचे दरवाजे सध्या बंद आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की निवडूक आयोग हे संकुल ताब्यात घेते. येथे मतदान यंत्र ठेवली जातत. मतमोजणीदेखील येथेच केली जाते. या कालावधीत खेळाडूंना संकुलात प्रवेश दिला जात नाही. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत क्रीडा संकुल निवडणूक आयोगाने ताब्यात घेतले होते. त्याची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर येथे कोरोनासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. सध्या येथे कच्च्या कैद्यांसाठी तात्पुरते जेल सुरू करण्यात आले आहे. खेळाडूंसाठी या संकुलाचे दरवाजे सध्या बंद आहेत. या संकुलाचा वापर खेळाव्यतिरिक्त इतर कामांसाठीच होत आहे. त्यामुळे खेळाडू नाराज आहेत.
लोकसभेच्या निवडणूक काळात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्यांनी क्रीडा संकुलाचा ताबा घेत इव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम तयार केली. त्यामुळे जवळजवळ वर्ष दोन वर्षे हे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी बंदच झाले. जिल्ह्यात माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा रायगडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली.जिल्ह्यात विभागीय क्रीडा संकुल होणार असेल तर त्याचा आनंदच आहे, परंतु जिल्हा क्रीडा संकुलाकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी क्रीडा कार्यकर्ते करीत आहेत.
क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर प्रस्ताव सादर केला जाईल. जलतरण तलावाचे फिल्टरेशनचे काम करण्यात आले आहे. दोन दिवसांत जलतरण तलाव सुरू होईल.
-संजय महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी