Friday , September 22 2023

मुगवली येथे भरधाव ट्रकची एसटीला धडक

10 प्रवासी जखमी; ट्रकचालक फरार

माणगाव ः प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर मुगवली येथे भरधाव येणार्‍या ट्रकने विरूद्ध दिशेला येऊन एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 14) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

महामार्गावर मुगवली गावच्या हद्दीत ट्रकचालक ट्रक (एमएच 08 एपी 7093) हा भरधाव वेगाने चालवित होता. त्या वेळी ट्रक विरूद्ध बाजूला आल्याने महाड बाजूकडून माणगावकडे येणार्‍या कोल्हापूर-रोहा एसटी (एमएच 20 बीएल 3011)ला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात एसटीमधील 10 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक हा ट्रक तेथेच सोडून पळून गेला. अपघात ठिकाणी तीन रुग्णवाहिका तत्काळ पाठवण्यात आल्या व रूग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आल्याची माहिती कांचन बिडवे उपजिल्हा व्यवस्थापक रायगड यांनी दिली आहे.

अपघातात रमेश गणपत घोणे (वय 70, रा. कोलाड), ज्ञानेश्वर नथुराम राऊत (वय 42, रा. कळमजे ता. माणगाव), छाया पांडुरंग पेंढणेकर (वय 40, रा. मांदाड), यशोदा तुकाराम भोसले (वय 65, रा. सातारा), सारिका मनोज कांबळे (वय 44, रा. सातारा), रणजित मधु वाढवळ (वय 35, रा. कळमजे ता.माणगांव), सुशिल बाबुराव माने (वय 37, रा. सातारा), राजेश्री बाबुराव माने (रा. सातारा), रंजना तुकाराम भोसले (वय 23, रा. सातारा), काशिबाई लक्ष्मण साळुंखे (वय 75, रा. सातारा) हे जखमी झाले आहेत.या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply