72 किमीचे अंतर पावणेतीन तासांत पूर्ण
कर्जत ः बातमीदार
नेरळमधील वकील आणि क्रीडापटू गजानन पालू डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड अट्टेम्प स्पर्धेत भाग घेऊन 72 किलोमीटरचे अंतर त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केले.देशातील 487 सायकलपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. वकील गजानन डुकरे यांनी 72 किलोमीटरचे अंतर पावणेतीन तासांत पूर्ण केले. या जागतिक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सर्वांत कमी वेळेत 72 किलोमीटर अंतर पार करणारे गजानन डुकरे देशात पहिले आले आहेत.
नेरळ-माथेरान घाट सायकलवरून न थांबता पूर्ण करण्याचा मान यापूर्वी डुकरे यांनी मिळविला आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील गजानन डुकरे कराटेपटू म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी देश-विदेशात जाऊन कराटेपटू म्हणून राष्ट्रीय स्पर्धांत सहभागी झाले आहेत. बुडकोन कराटेमध्ये चार ब्लॅक बेल्ट मिळविणारे डुकरे यांना सायकल चालविण्याचे वेड असून त्यांनी 2013मध्ये नेरळ-माथेरान हा तीव्र चढावाचा घाटरस्ता सायकलवरून न थांबता पूर्ण केला आहे. नेरळ-माथेरान घाटात मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील सायकलपटू सायकल चालविण्याचा प्रयत्न करतात, परंतु गजानन डुकरे वगळता कोणालाही नेरळ येथून माथेरान दस्तुरी नाका असा न थांबता सायकल प्रवास करता आला नाही. देश पातळीवर देशाच्या प्रजासत्ताक दिनी सायकलपटूंसाठी वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धा जाहीर करण्यात आली होती.
भारतीय बनावटीच्या सायकलला तिरंगा झेंडा लावून गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी देशात एकाच वेळी स्पर्धेला सुरुवात झाली. गजानन इंडिया-123 या क्रमांकाची जर्सी घालून डुकरे यांनी नेरळ गावातील हुतात्मा चौकातून प्रवासाला सुरुवात केली.
स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले 72 किलोमीटरचे अंतर डुकरे यांनी केवळ दोन तास 47 मिनिटांत पूर्ण केले. स्पर्धेतील हा आंतरराष्ट्रीय विक्रम असल्याचे बोलले जात आहे. नेरळमधील सायकलपटू गजानन डुकरे यांचा पावणेतीन तासांत 72 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा पराक्रम जागतिक पातळीवर विक्रमाला गवसणी घालणारा ठरला आहे. गजानन डुकरे यांचे सध्याचे वय लक्षात घेता त्यांनी 72 किलोमीटर अंतर सायकलवरून पावणेतीन तासांत पूर्ण करणे हे त्यांच्या फिटनेसचे यश असल्याचे सांगितले जात आहे.