आंदोलक शेतकर्यांविरोधात स्थानिक आक्रमक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवर गुरुवारी (दि. 28) सकाळपासून स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात केली आहे, तसेच आंदोलकांनी येथील रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा, अशी मागणीही स्थानिकांनी लावून धरली आहे.
सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू होती. रस्ता अडवून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे आपणास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. आंदोलकांनी शुक्रवारपर्यंत जागा रिकामी केली नाही, तर आम्ही येथे हजारोंच्या संख्येने पुन्हा येऊ, असा इशाराच स्थानिकांनी दिला आहे. 26 जानेवारीला जे घडले ते सहन करता येण्याजोगे नाही. आतापर्यंत आम्ही यांना शेतकरी समजत होतो, मात्र आता सत्य परिस्थिती आमच्यासमोर आली आहे, असेही स्थानिकांनी म्हटले आहे.
सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची मागणी करणार्यांमध्ये स्थानिक दुकानदारांचाही समावेश आहे. सिंघू बॉर्डर रिकामी करा, अशी मागणी करीत त्यांनी आंदोलन केले आहे. त्यांनी तिरंगाही सोबत घेतला आहे. सिंघू बॉर्डरवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक प्रभावित झाली. परिणामी दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, बुधवारी रेवाडीत अनेक गावांतील लोक पंचायतींचे आयोजन केल्यानंतर आंदोलकांजवळ पोहचले होते. आंदोलक आणि स्थानिक आमने-सामने आल्याने पोलीसही चिंतेत पडले होते, मात्र स्थानिकांचे पारडे जड दिसू लागल्यानंतर रस्ता अडवून आंदोलन करीत असलेल्या शेतकर्यांनी तिथून काढता पाय घेतला. 26 जानेवारी रोजी आयोजित ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाप्रति स्थानिक तसेच सर्वसामान्यांमध्ये असलेली सहानुभूती कमी झाली होती. त्यामुळे आता स्थानिक रहिवाशांकडून दिल्लीच्या सीमेवर रस्ता अडवून आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांना विरोध होत आहे.