गोवा ः प्रतिनिधी
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, तर वैचारिक-बौद्धीक उंचीसुद्धा असावी लागते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून पटोले यांच्या विधानाची निंदा केली जात आहे. भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून रहातो, पण काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात मी मोदींना मारू शकतो. काँग्रेस पक्षात चाललंय तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळला गेला आहे. सत्तेसाठी काहीही. काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना, अशा शब्दांत फडणवीस यांनी फटकारले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा ज्यांनी केली, त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि या अराजकतेवर कारवाईची मागणी करणार्या भाजपच्या लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांना जागोजागी ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जात आहे. कायद्याच्या कितीही चिंधड्या उडवा, वाट्टेल तसा पोलिसी दबाव आणा, भाजपचा कार्यकर्ता मूग गिळून गप्प बसणार नाही आणि या राज्यातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीला राबडीदेवी म्हटले तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. आणि इथे देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची भाषा करतात, पण त्यांच्यावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही हे खूप चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
पटोले तोंडघशी! ‘तो’ दावा पोलिसांनी काढला खोडून
भंडारा : मोदी नावाच्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता, पण आता त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. कारण त्यांचा हा दावा भंडारा पोलिसांनी खोडून काढला आहे. आम्ही मोदी नावाच्या कोणालाही अटक केलेली नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण पटोलेंना शेकणार असल्याचे दिसत आहे.
वादग्रस्त विधान करणे हा नाना पटोलेंचा स्वभाव आहे. त्यांच्या नेत्यांकडून त्यांनी गुण घेतले आहेत. हम करे सो कायदा अस राज्यातील चित्र सध्या आहे. आम्ही याची तक्रार राज्यपालांकडे करणार आहोत, तसेच नानांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत.
-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष