खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात खोपोलीनजीक टाटा पॉवरच्या सायमाळ वसाहतीजवळील अवघड वळणावर एक रिक्षा समोरून येणार्या खाजगी बसवर धडकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा येथून किरण वाघमारे याच्या रिक्षेतून (एमएच 14-एचएम 5296) रेल्वेचे कर्मचारी शत्रुंजय त्रिपाठी, राघवेंद्र राठोड, कुमार गौरव व सौरव पाठक रविवारी (दि. 6) सकाळी 11च्या सुमारास खोपोलीच्या दिशेने येत होते. ही रिक्षा सायमाळ येथे आली असता चालक किरण वाघमारे याचे रिक्षेवरील नियंत्रण सुटल्याने ती समोरून येणार्या खासगी बसवर (एमएच 04-जी 9925) जाऊन धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की कुमार गौरव यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. त्यांना प्रथम चौक येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच शत्रुंजय त्रिपाठी यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आयआरबी यंत्रणा, खोपोली व हायवे पोलीस, त्याचप्रमाणे अपघातग्रस्त मदत पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदतकार्य केले. रिक्षाचालक किरण वाघमारे हाही या अपघातात जखमी आहे, परंतु त्याची प्रकृत स्थिर असल्याने त्याच्यावर खोपोली नगर परिषद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळशेकर हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीच्या नातेवाईकांना माहिती कळवली आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper