Breaking News

रायगडात लसीकरण संथगतीने

सोमवारपासून पोलीस, महसूल, स्वच्छता कर्मचार्‍यांना टोचणार लस

अलिबाग ः प्रतिनिधी
वेळोवेळी केलेल्या जनजागृतीनंतरही रायगड जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील 64 टक्के आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली आहे. सोमवारपासून (दि. 1) पोलीस, महसूल आणि स्वच्छता कर्मचार्‍यांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
16 जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी 9500, तर दुसर्‍या टप्प्यात आणखीन 11 हजार कोविशिल्ड लशी उपलब्ध झाल्या आहेत, मात्र पुरेशा लशी उपलब्ध होऊनही आरोग्य कर्मचार्‍यांकडून लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. 30 जानेवारीअखेर जिल्ह्यातील 4908 आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण होणे अपेक्षित होते. यापैकी 3108 जणांनी प्रत्यक्ष लस घेतली. हे प्रमाण अपेक्षित लसीकरणाच्या 64 टक्के एवढेच आहे.
जिल्ह्यात सध्या अलिबाग, पेण, पनवेल, माणगाव आणि कर्जत येथील सात केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. पेण येथील लसीकरण पूर्ण झाले आहे. उरण येथे आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महाड आणि श्रीवर्धन येथेही लसीकरण सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात 20 हजार कोविशिल्डचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सोमवारपासून दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण सुरू केले जाणार आहे. यामध्ये कोविड केअर सेंटरवर आरोग्य यंत्रणेसोबत काम केलेल्या पोलीस, महसूल कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांनादेखील सोमवारपासून लसीकरण दिले जाणार असल्याची माहिती डॉ. गजानन गुंजकर यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply