चेन्नई : वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथील मैदानावर रंगणार आहेत. या मालिकेत विराट कोहलीला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर प्रत्येकी नऊ वेळा कसोटी मालिका जिंकल्या आहेत. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यास धोनीचा हा विक्रम विराट मोडीत काढेल. घरच्या मैदानावर धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 21 कसोटी सामने जिंकले आहेत, तर कोहलीने 20 सामन्यांत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत धोनीचा हा विक्रमही मोडीत काढण्याची संधी विराटकडे आहे. धोनीचे दोन्ही विक्रम मोडीत काढल्यास घरच्या मैदानावर सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर नवीन विक्रम होईल. तिसर्या क्रमांकावर मोहम्मद अजहरुद्दीन, तर चौथ्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे.
अश्विनलाही विक्रम खूणावतोय!
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला माजी खेळाडू हरभजन सिंगचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे. अश्विनने कसोटीत घेतलेल्या 377 विकेट्सपैकी 254 विकेट्स भारतात घेतल्या आहेत, तर हरभजनने भारतात 265 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध अश्विनने 12 विकेट घेतल्यास तो हरभजनला मागे टाकू शकतो. भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसर्या क्रमांकावर येऊ शकतो. या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. त्याने भारतात 350 विकेट घेतल्या आहेत.