Breaking News

शेळ्या-मेंढ्या अपहरणप्रकरणी खालापुरातील गोशाळाचालकावर गुन्हा दाखल

खोपोली : प्रतिनिधी

पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या शेळ्या-मेंढ्या संगोपनासाठी गोशाळेत दिल्या होत्या. त्या तेथून गायब केल्याप्रकरणी रणजित खंडागळे आणि चेतन शर्मा (रा. आसरेवाडी, चौक ता. खालापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पूणे द्रूतगती मार्गावरील टोल नाक्यावर काही दिवसांपुर्वी प्राणीमित्रांनी बंगलोरकडे जाणारा ट्रक अडवला होता, त्यात दाटीवाटीने 269शेळ्या मेंढ्यांची वाहतूक करण्यात येत होती. सरकारी नियमांचे उल्लंघन करून वाहतूक होत असल्याने पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. या वेळी जप्त केलेल्या ट्रकमधील 269 शेळ्या-मेंढ्या खालापूर पोलिसांनी सुरक्षिततेच्या व संगोपनाच्या दृष्टीकोनातून आसरेवाडी चौक (ता. खालापूर) येथील राधाकृष्ण गोशाळेत जमा केल्या होत्या. मात्र गोशाळा चालक चेतन शर्मा आणि रणजित खंडागळे यांनी त्यापैकी 83मेंढ्या व 103 शेळया परस्पर दुसर्‍या ठिकाणी गोशाळेत पाठवल्या. शेळ्या-मेंढ्यांचे मुळ मालक अय्याज अजीज कुरेशी  (रा. अहमदाबाद-गुजरात) हे जप्त माल परत घेण्यासाठी आले असताना, त्यांना शेळ्या-मेंढ्या कमी आढळून आल्या तसेच संगोपनाचा खर्च म्हणून त्यांच्याकडे पाच लाखाची मागणी करण्यात आली. त्यामुळे कुरेशी यांनी रायगड पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत तक्रार दिली. या घटनेची माहिती घेत खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी कुरेशी यांच्या तक्रारीनुसार गोशाळा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 406, 407, 34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संजय बांगर करीत आहेत.

या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. टोल नाक्यावर बेकायदा ट्रक अडवणारे, शेळ्या-मेंढ्याची कोंबून वाहतूक प्रकरणी ट्रक चालक आणि शेळ्या-मेंढ्या अपहार प्रकरणी गोशाळा चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खालापूर पोलिसांच्या ताब्यातून बोकड गायब झाले नसून संगोपनासाठी दिल्यानंतर गोशाळा चालकाकडून प्रकार घडला आहे.

-अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, खालापूर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply