मुंबई ः प्रतिनिधी
रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठविले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले होते. भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.1.617.2 या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही हे समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे. आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लस सापडला. त्यानंतर आम्ही आणखी नमुने पाठविले, पण अंतिम अहवाल अपेक्षित आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया (डीएमईआर)चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये तसेच कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीमध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. डेल्टा प्लसचे सातपैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत.