Breaking News

टीम इंडियाचे विमान जमिनीवर!

पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून दारुण पराभव

चेन्नई : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर मायदेशात पहिलीच कसोटी मालिका खेळणार्‍या टीम इंडियाचे विमान जमिनीवर आले. इंग्लंड संघाने यजमान भारतावर 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव 192 धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली याने एकाकी झुंज देत 72 धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. इंग्लंडकडून जॅक लीचने चार, तर जेम्स अँडरसनने तीन गडी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
चौथ्या दिवशी रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर पाचव्या दिवशी टीम इंडियासमोरील आव्हान सोपे नसेल हे सार्‍यांनाच माहित होते. सकाळच्या सत्रात जॅक लिचने गोलंदाजांना मदत करणार्‍या खेळपट्टीचा फायदा उचलला आणि चेतेश्वर पुजाराला माघारी पाठवले,  पण शुबमन गिल आक्रमक पवित्र्यातच होता. त्याने 83 चेंडूंत सात चौकार व एक षटकार खेचून 50 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीही दुसर्‍या बाजूने खेळपट्टीवर चिटकून होता.
विराटला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने चेंडू 38 वर्षीय जेम्स अँडरसनच्या हाती सोपवला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. 27व्या षटकात अँडरसनने शुबमन गिल व अजिंक्य रहाणे यांचा त्रिफळा उडवला. वॉशिंग्टन सुंदर (0) डॉम बेसच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर विराटने आर. अश्विनला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी केली, पण अश्विनला (9) जॅक लिचने बाद केले. टीम इंडियाचा पराभव अटळ होता, परंतु विराट खेळपट्टीवर असल्याने आशा कायम होत्या. बेन स्टोक्सने भारतीयांच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या.
एका खाली राहिलेल्या चेंडूवर बेन स्टोक्सन कर्णधार विराटचा त्रिफळा उडवला. विराटने 104 चेंडूंत नऊ चौकारांसह 72 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचे शेपूट सहज गुंडाळले आणि विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघाला तब्बल 22 वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव-सर्वबाद 578 (जो रूट 218; बुमराह 84/3) भारत पहिला डाव-सर्वबाद 337 (ऋषभ पंत 91; डॉम बेस 76/4) इंग्लंड दुसरा डाव सर्वबाद 178 (जो रूट 40; अश्विन 61/6) भारत दुसरा डाव-सर्वबाद 192 (विराट कोहली 72; जॅक लीच-76/4). इंग्लंड विजयी. सामनावीर जो रूट.
अँडरसनने मोडला वॉल्श यांचा विक्रम
तीशीपार जाऊन सर्वाधिक विकेट्स घेण्याचा जलदगती गोलंदाजाचा विक्रम अँडरसनच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने तीशीनंतर 343 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्टनी वॉल्श (341) यांच्या नावावर हा विक्रम होता. ग्लेन मॅकग्रा (287) आणि रिचर्ड हेडली (276) हे अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर आहेत. या विक्रमात श्रीलंकेचा रंगना हेराथ 398 विकेट्सह आघाडीवर आहे. त्यानंतर मुथय्या मुरलीधरन (388) आणि शेन वॉर्न (386) यांचा क्रमांक येतो, तर अनिल कुंबळे 343 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply