Breaking News

महाविकास आघाडीत धुसफूस

शिवसेना नेत्यांची नवी मुंबईत स्वबळाची मागणी

नवी मुंबई : खास प्रतिनिधी
महाविकास आघाडीने आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्यस्तरीय नेत्यांनी आघाडी करून लढण्याचे आदेश दिले असले तरीही स्थानिक पातळीवर आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. अशातच नवी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवी मुंबई महापालिकेत एकूण 111 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या वेळी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी या नेत्यांनी ठाकरेंकडे केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबईत महापालिकेत भाजपची सत्ता आहे. नाईक कुटुंबाने राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या महापालिकेवर ‘कमळ’ फुलले. आता निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 32 आणि राष्ट्रवादीने 40 जागा मागितल्या आहेत, तर शिवसेना 70 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण 111)
भाजप-56
शिवसेना-38
काँग्रेस-10
राष्ट्रवादी-2
इतर-5

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply