Breaking News

भारताला अद्यापही फायनलची संधी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासाह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेतील अव्वल स्थान गमाविले. गुणतालिकेत टीम इंडियाची पहिल्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा विजय मिळवत इंग्लंडने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविले आहे.
चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे, तर पहिल्या क्रमांकावर असणारा भारताचा संघ 68.3 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. 70 टक्क्यांसह न्यूझीलंड दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 69.2 आहे. इंग्लंडने भारताचा पराभव करीत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गणिते बदलली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा डब्ल्यूटीसी गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचे तिकीट मिळाले, पण न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे.
आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सामना होणार आहे. चेन्नई कसोटी सामन्यानंतर आयसीसीने ट्विट करीत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची काही समीकरणे सांगितली आहेत. आयसीसीने सांगितलेल्या समीकरणानुसार भारतीय संघ अद्याप कसोटी अजिंक्यपद
स्पर्धेची फायनल खेळू शकतो. त्यासाठी भारतीय संघाला इंग्लंडचा 2-1 किंवा 3-1ने पराभव करावा लागणार आहे.
दुसरीकडे इंग्लंड संघाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला 3-0, 3-1 किंवा 4-0ने पराभूत करावे लागेल, तर ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी इंग्लंड-भारत मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. त्यानुसार इंग्लंडचा एकपेक्षा जास्त पराभव होऊ नये. इंग्लंडने भारताचा 1-0, 2-0 किंवा 2-1ने पराभव केल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहचेल. 1-1 किंवा 2-2ने मालिका बरोबरीत सुटल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहचण्याची संधी आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply