कळंबोली : बातमीदार
लाचखोरी प्रकरणात पनवेल पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी रंगेहाथ पकडल्यानंतर पनवेलमध्ये बर्याच वर्षांनी रिक्त झालेल्या गट शिक्षण अधिकारी पदावर महेश खामकर यांची शासनाने गट शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र प्राप्त होताच महेश खामकर यांनी पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला असून ते रुजूही झाले आहेत. त्यावेळी त्यांचे स्वाभिमानी शिक्षक संघटनेने हार्दिक स्वागत करून भेट घेतली.
मुंबई व रायगडचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलसारख्या मोठ्या तालुक्यात शैक्षणिक संकुलांचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू शाळांचे जाळे येथे विणले गेले आहे. विद्यार्थी संख्या व शिक्षक कर्मचारी संख्या या पनवेल तालुक्यात मोठी असून जिल्हा परिषदेच्या शाळांचे जाळे ही तितकेच मोठे आहे. अशा भव्य असणार्या पनवेलला अद्यापपर्यंत कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी म्हणून प्राप्त झालाच नाही. कायम प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून लाचखोरीत पकडण्यात आलेले नवनाथ साबळे हे गेले आठ ते दहा वर्षापासून तळ ठोकून होते. मात्र आता शासनाने वर्ग 2 चे अधिकारी असलेले महेश खामकर यांची पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीपत्र प्राप्त होतच पनवेलचा गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारून ते रुजू झाले आहेत.
पनवेलमध्ये त्यांचे विविध संघटनांनी समक्ष भेटून हार्दिक स्वागत करुन अभिनंदन केले आहे. या वेळी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष भोपी, उरण शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नवनीत गावंड तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी महेश खामकर यांची भेट घेऊन त्यांच्या पनवेलमधील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.