Breaking News

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत

‘त्या’ तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड सशयाच्या भोवर्‍यात

  • ऑडिओ क्लिप व्हायरल; सर्वत्र खळबळ

मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे केलेले आरोप ताजे असतानाच आता आणखी एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या प्रकरणात समाजमाध्यमांवरून समोर आले आहे. पुण्यात आत्महत्या करणारी तरुणी पूजा चव्हाण आणि शिवसेना नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी बीड जिल्ह्यातील परळीची राहणारी होती. फेसबूक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते आहेत. एक महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी आली. ती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टीकटॉक अ‍ॅपमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.
अशातच मंत्री संजय राठोड आणि पूजा यांच्यामध्ये मध्यस्थ असलेला एक कार्यकर्ता यांच्यातील संभाषणाचे कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले आहेत. या संभाषणातील ए म्हणजे तो मंत्री, तर बी म्हणजे कार्यकर्ता आहे. या कॉल रेकॉर्डनुसार पूजा ही गर्भवती असल्याचे समोर येत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण्यावरून व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील म्हणत आहे. त्याचवेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात मंत्री संजय राठोड व त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण आहे. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि मंत्र्याने युवतीचा मोबाइल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते. अर्थात, या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.
भाजप आक्रमक; चौकशी-कारवाईची मागणी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तत्काळ कारवाईची मागणी केली आहे, तर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राठोड यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये आक्षेपार्ह माहिती आढळली आहे. पोलिसांनी तिचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाही तर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात 12 ऑडिओ क्लिप बाहेर आल्या आहेत. त्या प्रत्येक क्लिपचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. शक्ती कायदा येतोय, त्याचे स्वागत आहे, मात्र कायदे बनवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नसेल तर महाराष्ट्रातील महिला आणि मुली सुरक्षित होणार नाहीत.
-चित्रा वाघ, भाजप नेत्या

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply