Breaking News

…तर महाराष्ट्राचेच नाव बदला!

अबू आझमींची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
’औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचे नाव बदलणे योग्य नाही. त्यामुळे विकास होणार नाही. बदलायचेच असेल तर आधी महाराष्ट्राचे नाव बदला,’ असे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.
औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या भलताच गाजत आहे. शिवसेनेने उपस्थित केलेल्या या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने नामांतराला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. आता आघाडी सरकारला पाठिंबा देणार्‍या समाजवादी पक्षानेही नामांतर योग्य नसल्याचे म्हटले आहे.
सपचे नेते अबू आझमी यांनी एका व्हिडिओद्वारे उद्धव ठाकरे यांना एक विनंती केली आहे. ’शहरांची नावे बदलून कुणाचे पोट भरत नाही. शहरांना आवडीचे नाव ठेवायचेच असेल नवे शहर वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर योग्य नाही. नामांतर करायचेच असेल तर आधी महाराष्ट्र राज्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. रायगडचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव द्या. लोकांनाही ते आवडेल, मात्र केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणे हे आपल्याला शोभत नाही,’ असे आझमी यांनी म्हटले आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply