Breaking News

सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची

-अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ

मुरूड : प्रतिनिधी

समाजात शांतता राखण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका  महत्त्वाची आहे, मात्र सध्या सोशल मीडिया अफवा पसरवण्याचे माध्यम बनले आहे. दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी पोस्ट फॉरवर्ड करू नका. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी प्रत्येक मोबाइलधारकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी येथे केले.

रायगड जिल्हा उत्कर्ष मंडळ फलाही तंजीम या संस्थेच्या वतीने मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय एकात्मता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात  गुंजाळ  मार्गदर्शन करीत होते. भारतासारखा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा देश संपूर्ण जगात सापडणार नाही, असा दावा त्यांनी या वेळी केला.

माणसाने पशूसारखे वागू नये. माणुसकी व आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा संदेश राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमातून द्यावयाचा असल्याचे सांगून कोकण- ए-खतीब पुरस्कारप्राप्त अली एम. शम्सी यांनी प्रास्ताविकात संमेलनाचा हेतू विषद केला. नगराध्यक्षा स्नेहा पाटील, लेखक सुरेश सावंत, मुस्तफा पुंजेकर, अ‍ॅड. फैसल काजी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

समाजसेवक सनाउल्ला घरटकर यांनी 55 लाख रुपये खर्च करून आणलेली कार्डिओ अ‍ॅम्ब्युलन्स संजीवनी आरोग्य संस्थेचे अध्यक्ष विजय सुर्वे यांच्या ताब्यात दिली. या वेळी राशीद फहीम, मुस्तफा पुंजेकर, बिलाल महाडकर, नाईक महाविद्यालयाचे उपप्राचार्य विश्वास चव्हाण, इम्तियाज पालकर, जाफर देशमुख, पोलीस निरीक्षक किशोर साळे, संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष शबीर पालोजी यांच्यासह बहुसंख्य हिंदू-मुस्लीम नागरिक उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply