Breaking News

350वा शिवराज्याभिषेक दिन अभूतपूर्व उत्साहात

लाखो शिवप्रेमींची उपस्थिती; नयनरम्य सोहळा

अलिबाग : प्रतिनिधी
असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने ऐतिहासिक रायगडावर 350व्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा मंगळवारी (दि. 6) अभूतपूर्व उत्साहात झाला. या सोहळ्यासाठी किल्ल्यावर न भूतो न भविष्यति अशी गर्दी जमली होती. या वेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी आम्हाला निधीऐवजी संवर्धनासाठी 50 किल्ले द्या, आपण हे किल्ले रायगड मॉडेल करून दाखवू, असे प्रतिपादन केले.
पहाटेचे धुके, मंगलमय सूर, ढोल-ताशांचा गजर, धनगरी ओव्या, पोवाडे, बेल-भंडार्‍याची उधळण अशा जल्लोषात तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण रायगड किल्ला आणि परिसर दुमदुमून गेला होता. किल्ल्यावरील राजसदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर अशा सर्वच ठिकाणी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त, मर्दानी खेळ, लोककलांचे सादरीकरण, पोवाडे यामुळे वातावरण शिवमय झाले होते.
पालखीचे आगमन होताच शिवभक्तांनी जय भवानी, जय शिवाजीचा एकच जयघोष केला. राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीला छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी विधीवत अभिषेक केला. यानंतर शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास 350 सुवर्ण होनांनी अभिषेक करण्यात आला. या वेळी पोलीस प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देण्यात आली. त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली.
या सोहळ्यास राजसदरेवर युवराज्ञी संयोगिता राजे, युवराज शहाजी महाराज, आमदार सर्वश्री मंगेश चव्हाण, रोहित पवार, अनिकेत तटकरे, माजी मंत्री सतेज पाटील, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply