पनवेल : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ते महिना दीड लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात, मात्र त्यांच्याकडे चारचाकी कार नसल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पार्थ पवार यांनी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात व्यवसाय आणि शेतीपासून त्यांना 19 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न वर्षाला मिळत असल्याची माहिती दिली आहे. त्यांचे बँकेच्या बचत खात्यात 34 लाख 19 हजार 6 रुपये, तर मुदत ठेवीत 31 लाख 47 हजार 104 रुपये आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 30 किलो चांदी आणि 391 ग्रॅम सोने आहे. ते आपल्या आईला सात कोटी 13 लाख 13 हजार 295 आणि भावाला दोन कोटी 23 लाख देणे आहेत, तसेच आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांना त्यांनी 70 लाख रुपये दिले आहेत.