पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रातील खांदेश्वर रेल्वे लाइनवरील धाकटा खांदा येथील पादचारी पुलाचे (एफओबी) लोकार्पण सोमवारी (दि. 15) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या धाकटा खांदा गावात जाण्यासाठी महामार्गावरून किंवा कामोठ्याकडून रेल्वे लाइन ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे या भागात अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या ठिकाणी पादचारी पूल व्हावा यासाठी स्थानिक नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी प्रयत्न केले. त्याला यश येऊन मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनने पादचारी पुलासाठी तीन कोटी रुपये मंजूर करून के. डी. कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत काम पूर्ण करून घेतले.
या पादचारी पुलाचे लोकार्पण सोमवारी सकाळी 10.30 वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील तसेच दत्तात्रेय (बुवाशेठ) भगत, भीमराव पोवार आदी उपस्थित होते.
या ठिकाणी अनेक अपघात झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी येथे रस्त्याची मागणी केली होती. दुर्दैवाने आम्हाला रस्ता मिळाला नाही, पण आज पूल पूर्ण झाला. मला खात्री आहे आता या मार्गाचा वापर केल्याने एकही अपघात होणार नाही. ग्रामस्थांच्या हिताचे एक महत्त्वाचे पाऊल रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या माध्यमातून पूर्ण करता आल्याने केंद्र शासनाचे आणि रेल्वेचे आभार मानतो.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, भाजप उत्तर रायगड जिल्हा