खोपोली : प्रतिनिधी
जलवाहिनीचे वॉल नादुरुस्त असल्याने खोपोली नगर परिषद हद्दीतील वासरंग रेल्वेफाटकासमोर गेले दोन दिवस हजारो लिटर पाणी वाया गेले तसेच लौजी, श्रीरामनगर, उदयविहार या भागात पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात झाला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेच्या जलवाहिनीचा वासरंग फाटकाजवळील वॉल नेहमीच नादुरुस्त असतो. गेली अनेक वर्ष या वालची कायमस्वरूपी दुरुस्ती केले जात नाही. परिणामी अनेकदा हजारो लिटर पाणी वाया जाते. वालमधून बाहेर पडणार्या पाण्यात वाहनचालक वाहने धुण्यासारखी कामे करीत असल्याने नागरिकांना अनेकदा दूषित पाणीपुरवठा होत असतो. पाणी पुरवठा विभागाने एकदा कायमस्वरूपी दुरुस्ती करावी व हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पुढे येत आहे.
नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या रविवार व सोमवारी वॉलचे लिकेज शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते, या दरम्यान लौजी- वासरंग रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मंगळवारी संध्याकाळी येथील लिकेजची दुरूस्ती करण्यात आली.