मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील राजपुरी ग्रुपग्रामपंचायत हद्दीमधील डोंगरी गावाला आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र महावितरणने वीज पुरवठा खंडीत केल्याने या योजनेतील पंप बंद झाला आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून डोंगरी गावात पाण्याचा थेंबही येत नाही, त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
डोंगरी गावाला 2018पासून आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु या पाणीपुरवठा योजनेतील वीज पंपाचे बिल थकीत राहिल्याने महावितरणने येथील वीज जोडणी तोडली आहे. त्यामुळे 27डिसेंबर 2020पासून पंप बंद असून डोंगरी गावात पाणी येत नाही. येथील वीज जोडणीबाबत राजपुरी ग्रुपग्रामपंचायत अथवा मुरुड पंचायत समितीकडून कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने डोंगरीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी खूप दूरवर पायपीट करावी लागत आहे. गावातील बहुतांशी महिला मुरुड शहरातून पाणी आणतात, तर काही महिला डोंगर कपारीत साचलेले पाणी गोळा करतात.
राजपुरी गावाला मुबलक पाणीपुरवठा होत आहे, मात्र त्याच ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील डोंगरी गावाला पाण्यापासून वंचीत रहावे लागत आहे. केवळ वीज बिल न भरल्याने डोंगरी ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही.
दरम्यान, डोंगरी गावात 27डिसेंबर 2020पासून पाणी येत नसून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावाचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी मुरुड तहसीलदार गमन गावित यांच्याकडे मंगळवारी (दि. 16) निवेदनाद्वारे केली आहे.