आठ फ्रँचायझी लावणार 292 खेळाडूंवर बोली
चेन्नई : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वासाठी होणार्या लिलावामध्ये (ऑक्शन) आठ फ्रँचायझी 292 खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल 2021च्या मिनी ऑक्शनसाठीच्या 61 रिक्त जागांसाठी 292 खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये 196.6 कोटी आहेत. चेन्नईत गुरुवारी (दि. 18) हे ऑक्शन होणार आहे.
आयपीएल 2021 मिनी ऑक्शनसाठी 1114 खेळाडूंनी नाव नोंदवली होती, परंतु आठ फ्रँचायझींनी यापैकी 292 नावांची अंतिम यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सोपवली. ऑक्शनला सामोरे जाताना फ्रँचायझींना सहा नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल; अन्यथा त्यांना भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
आयपीएल ऑक्शनसाठी सर्व फ्रँयाचझीच्या संबंधित व्यक्ती चेन्नईत एक दिवस आधीच पोहोचले आहेत. त्यांची कोरोना चाचणी होईल. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ऑक्शनमध्ये भाग घेणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर हेही ऑक्शनमध्ये भाग घेणार नाहीत.
मेगा ऑक्शन तीन वर्षांनी होतो, तर मिनी ऑक्शन प्रत्येक वर्षी होतो. मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक फ्रँचायझी पाच खेळाडूंना रिटेन करू शकते, तर मिनी ऑक्शनमध्ये रिटेन करणार्या खेळाडूंच्या संख्येला मर्यादा नाही.
लिलावासाठीचे नियम
- कोणत्याही फ्रँचाझीला त्यांच्या पर्समध्ये उपलब्ध असलेल्या रकमेपेक्षा अधिक बोली लावता येणार नाही.
- बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नियमानुसार सर्व फ्रँचायझींना त्यांच्या एकूण रकमेतील 75 टक्के रक्कम ही खेळाडूंवर खर्च करावी लागले. असे करण्यात कोणती फ्रँचायझी अपयशी ठरल्यास त्यांची उर्वरित रक्कम जप्त केली जाईल
- यंदा मेगा ऑक्शन होणार नाही. त्यामुळे आरटीएम म्हणजेच राईट टू मॅच कार्ड वापरता येणार नाही.
- कॅप आणि अनकॅप अशी मिळून भारतीय खेळाडूंची संख्या कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 25 होऊ शकते.
- आयपीएलच्या एका संघात आठहून जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू असायला हवेत.