Breaking News

वंडर्स पार्कमध्ये येणार अत्याधुनिक खेळणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी, धोकादायक आणि नादुरुस्त झाली असून अनेक खेळणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे पार्कमध्ये येणार्‍या नागरिक आणि लहान मुलांचा हिरमोड होत आहे. या पार्कच्या सुधारणेसह फेरबदल केला जाणार असून विविध अत्याधुनिक खेळणी बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वंडर्स पार्कला नवीन झळाळी देण्यासाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

शहराच्या आकर्षणात भर घालणार्‍या आणि शहराचे नावलौकिक वाढविणार्‍या नेरूळ सेक्टर 19 मधील वंडर्स पार्कला विविध खेळणी, जगातील सात आश्चर्याच्या प्रतिकृती, हिरवळ आदींमुळे नागरिक आणि बच्चेकंपनीने पसंती दिली आहे. पार्कमध्ये 2010 साली खेळणी बसविण्यात आली असून फेसबी, ऑक्टोपस, क्रिकेट गेम ही खेळणी धोकादायक झाल्याने बंद आहेत. तसेच फेरीस व्हील, ब्रेक डान्स, मिनी टॉय ट्रेन या खेळण्यांचे आयुष्यमान संपुष्टात आले आहे.

येथील अनेक खेळणी बंद असल्याने बच्चेकंपनीचा हिरमोड होत असल्याने पार्कमध्ये फेरबदल करून सुधारणा करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने बंपर कार, स्काय स्वीगर, स्काय लॉफटर, स्काय व्हील, रॉकिंग डिस्क, वॉर्म कोस्टर या सहा अत्याधुनिक जॉय राइड्स बसविण्यात येणार आहेत तसेच, म्युझिकल फौंटन, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, मनोरंजनासाठी ऑडिओ सिस्टीमही  बसविण्यात येणार आहे. या नव्या खेळण्यांमुळे त्यामुळे बच्चेकंपनीत उत्साह वाढणार आहे.

वंडर्स पार्कमध्ये प्रवेशासाठी तसेच विविध खेळण्यांचा आनंद घेण्यासाठी तिकीट आकारण्यात येते. तिकीट खरेदीची प्रकिया कॅशलेस होण्यासाठी स्मार्ट कार्ड सिस्टीम बसविण्यात येणार आहे. यामुळे तिकीट खरेदीसाठी लागणारा विलंब टाळता येणार असून नागरिकांना रांगा लावण्याची गरज पडणार नाही.

वंडर्स पार्कमध्ये फेरबदल आणि सुधारणा करण्याचा कामाचा प्रस्ताव निविदा प्रक्रियेत आहे. पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यावर पार्कच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांचा आणखी ओढा वाढेल.

-सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, न.मुं.म.पा.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply