Breaking News

नदाल, बार्टीचे आव्हान संपुष्टात

सिडनी : वृत्तसंस्था
स्पेनच्या दुसर्‍या मानांकित राफेल नदालचे कारकीर्दीतील 21वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न स्टेफानोस त्सित्सिपास याने उधळून लावले. जेतेपदाचा दावेदार समजला जाणारा नदाल तसेच महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी यांचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
सुरुवातीचे दोन सेट जिंकूनही खेळात सातत्य राखता न आल्याने नदालला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नदालला ग्रीसच्या पाचव्या मानांकित त्सित्सिपास याने 6-3, 6-2, 6-7 (4), 4-6, 5-7 असे हरवले आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. कारकीर्दीत नदालने 225व्यांदा पहिले दोन सेट जिंकल्यानंतर कामगिरी खालावल्याने पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली. आता उपांत्य फेरीत त्सित्सिपासला अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपविजेता डॅनिल मेदवेदेव याच्याशी झुंजावे लागेल.
रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याने आपल्याच देशाच्या आंद्रेय रुबलेव्ह याच्यावर 7-5, 6-3, 6-2 असा विजय संपादन केला. मेदवेदेव याने सुरुवातीपासूनच आपला खेळ उंचावत रुबलेव्हला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. चौथ्या मानांकित मेदवेदेव याने कारकीर्दीत तिसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. चेक प्रजासत्ताकची प्रतिस्पर्धी कॅरोलिना मुचोव्हा हिने वैद्यकीय उपचारासाठी वेळ मागून घेतला, पण पुन्हा एकदा कोर्टवर पुनरागमन करीत बार्टी हिचा 1-6, 6-3, 6-2 असा पाडाव केला. 25व्या मानांकित मुचोव्हा हिने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. मुचोव्हा हिला उपांत्य फेरीत 22व्या मानांकित जेनिफर ब्रॅडी हिच्याशी लढत द्यावी लागेल.
अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी हिने आपल्याच देशाच्या जेसिका पेगुला हिच्यावर तीन सेटमध्ये 4-6, 6-2, 6-1 अशी मात करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ब्रॅडी हिने कारकीर्दीत दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्रॅडीला उपांत्य फेरीत कॅरोलिना मुचोव्हा हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सलग 11व्या वर्षी अमेरिकेच्या महिला टेनिसपटूने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची करामत केली.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply