Breaking News

सुधागडात मुसळधार पाऊस

 गारपिटीचा बागायतदारांना फटका; वीटभट्टी व्यवसायही कोलमडला

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात गुरुवारी (दि. 18) सायंकाळी   सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारपिटीने विविध भागाला झोडपून काढले. या वेळी वीज गायब झाली होती. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे.

सध्या सुधागड तालुक्यात वाल, मूग, हरभरा आदी कडधान्ये तसेच पालेभाज्या, फळभाज्या चांगल्या बहरल्या आहेत. मात्र गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना संकटात टाकले आहे. आंबा व काजू फळबागांचेदेखील मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यात वीटभट्टी व्यवसायदेखील तेजीत होता. मात्र अचानक झालेल्या पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका बसला आहे.

दरम्यान डोंगर, माळरानावरील पीक लागवडीला व  फळबागांना गुरुवारी झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना आर्थिक झळ पोहचली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या शेतमाल व बागांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

सुधागड तालुक्यात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, सुधागड

अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी.

-हरिचंद्र शिंदे, अध्यक्ष, शेतकरी संघटना, पाली, ता. सुधागड

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply