शेतकर्यांचा विरोध, रास्ता रोको; वाघुलवाडी ते तळेखार प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प
रेवदंडा : प्रतिनिधी
शेतकरी व मच्छीमार संघर्ष समितीने प्रस्तावित वाघुलवाडी ते तळेखार एमआयडीसी प्रकल्पाच्या वळके येथील जनसुनावणीस गुरुवारी (दि. 18) जोरदार विरोध दर्शविला. शासनाच्या वतीने जनसुनावणी रद्द केल्याचे सांगण्यात आले, मात्र तसे लेखी पत्र देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती व भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केली. या वेळी ग्रामस्थांनी रोहा ते रेवदंडा रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
एमआयडीसीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी मुरूड तालुक्यातील वाघुळवाडी, आमली, येसदे, शिरगाव, वळके, सार्तिडे, चोरढे, वेताळवाडी, तळेखार, तळे, शिवगाव आदी 14गावातील जमीनी संपादित करण्यासाठी संबंधीत शेतकर्यांना शासनाचे वतीने नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. संबंधीत शेतकर्यांनी वाघुलवाडी ते तळेखार शेतकरी व मच्छीमार संघर्ष समिती स्थापन केली आहे. शासनाच्या वतीने गुरुवारी वळके येथे प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाची जनसुनावणी आयोजीत केली होती. त्याला वाघुलवाडी ते तळेखार परिसरातील ग्रामस्थांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली या जनसुनावणीस जोरदार विरोध केला. त्यामुळे जनसुनावणी रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावर संघर्ष समिती व अॅड. महेश मोहित यांनी जनसुनावणी रद्द केल्याचे लेखी पत्र द्यावे, अशी मागणी केली तर ग्रामस्थांनी महिलांसह रोहा ते रेवदंडा रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक पुर्णतः बंद झाली. या वेळी आंंदोलनकर्त्यानी प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पास विरोध व निषेध करून भजने गायली, तर महिला व ग्रामस्थांनी हातात काळे झेंडे घेऊन एमआयडीसी विरोधात घोषणाबाजी केली. अॅड. मोहिते यांनी जनसुनावणी रद्द केल्याचे लेखी पत्र द्यावे, अशी मागणी करून आंदोलन शांततेने करण्याचे आवाहन केले.
विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक थोरात यांनी या वेळी चोख बदोबस्त ठेवला होता. या वेळी रायगड पोलिसांचे दंगल नियंत्रण पथकसुध्दा तैनात होते.