Breaking News

पुनश्च निर्बंध

गतवर्षी होत्याचे नव्हते करून टाकणार्‍या कोरोना महामारीला वर्षाअखेरीस उतरती कळा लागली आणि जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले. त्यामुळे नव्या वर्षात सर्व काही आलबेल असेल असे वाटत असतानाच कोविड-19चा विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागलाय. परिणामी राज्यातील काही भागांत पुनश्च निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

एखादे मोठे संकट येऊन गेल्यावर प्रचंड वाताहत होते. त्यातून कसेबसे सावरत असताना पुन्हा नव्या संकटाची चाहूल लागल्यावर जी स्थिती होते तशीच परिस्थिती सध्या राज्यात आहे. कोरोना संसर्ग क्षमला असे चित्र दिसत असताना या विषाणूने पुन्हा आपला विळखा घालायला सुरुवात केली आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, मृतांचे प्रमाणही हळूहळू वाढू लागले आहे. विशेषत: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून, इतर जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना तातडीने निर्णय घेऊन पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन निर्बंध घालण्यात येत आहेत. राज्यात जेथे पहिला कोरोना रुग्ण आढळला होता त्या पुण्यात अनेक गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. तेथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, अन्य काही निर्बंध घालण्यात आले आहेत. अमरावती व अन्य ठिकाणी तर एक दिवसाचा लॉकडाऊन घेण्यात आला. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते. अशाच प्रकारे इतरत्रही निर्णय घेतला जाऊ शकतो इतका कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. कोविड-19चा संसर्ग पुन्हा वाढण्याची जी कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे नागरिकांचा बेफिकीरपणा. कोरोना गेला असे समजून अनेक लोक बिनधास्तपणे वावरत होते. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, हात धुणे ही त्रिसूत्री तर अनेक जण विसरून गेले होते. दुसरीकडे राज्य सरकारही बिनधास्त झाले होते. ज्या उपाययोजना गतवर्षी केल्या जात होत्या, जी कार्यवाही व कारवाई केली जात होती ती नव्या वर्षी दिसत नव्हती. केवळ आवाहन करण्यात धन्यता मानली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप कोरोना गेलेला नाही. काळजी घ्या, असे वारंवार सांगत असतानाही त्याकडे काही राज्यांनी दुर्लक्ष केले. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता. राज्यातील ठाकरे सरकारबद्दल काय बोलणार. या सरकारची तीन दिशेला तीन तोंडे आहेत. जिथे खुद्द सरकारमध्येच समन्वय नाही तिथे ते काय परिस्थिती हाताळणार आणि जनतेला सुरक्षित ठेवणार. संकटाच्या वेळी राजाने आघाडीवर येऊन लढणे अपेक्षित असते. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरी बसूनच कारभार करीत होते. भाजपकडून बरीच टीका झाल्यानंतर ते घराबाहेर पडले. आतासुद्धा नेमक्याच कार्यक्रमांना ते उपस्थित असतात. वास्तविक त्यांनी स्वत: ठोस उपाययोजना राबवून आणि मुख्य म्हणजे त्यात सातत्य कसे राहील याकडे जातीने लक्ष देणे आवश्यक होते, मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. परिणामी आता राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येत आहे. खरंतर एवढे मोठे संकट येऊन गेल्यानंतर त्यातून शिकून पुन्हा अशी वेळ येऊ नये या दृष्टीने पावले टाकणे क्रमप्राप्त होते, पण राज्य सरकार सुस्त झाले होते. त्यामुळे लोकही निर्धास्त झाले. त्यातूनच पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. आता तरी सर्वांनी सतर्क राहावे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply