Breaking News

बांधिवलीतील प्राथमिक शाळेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण

लोकवर्गणीतून कायापालट; एम्पथी फाऊंडेशनचे सहाय्य

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बांधिवली येथील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पावसाळ्यात आलेल्या वादळाने मोडकळीस आली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची अडचण ओळखून एम्पथी फाऊंडेशन मुंबई या संस्थेने तब्बल 18 लाख रुपये खर्च करून शाळेच्या वास्तूला नवीन रूप दिले आहे. शाळेतील शिक्षक व शाळा सुधार समितीने शाळेसाठी लोकवर्गणी गोळा केली. यातून दोन लाख रुपये जमा करून सुसज्ज अद्ययावत शाळा पुन्हा उभी करून   सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.

बांधिवली गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची झालेली पडझड आणि इमारत मोडकळीस आल्याने या शाळेची पुनर्बांधणी होणे गरजेचे होते. त्यासाठी शिक्षिका रंजना चौधरी यांनी दोन वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. घाटकोपर रोटरी क्लबचे विरेन गोहिल आणि एम्पथी फाऊंडेशन यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. एम्पथी फाऊंडेशनने प्रक्रियेची पूर्तता करण्याच्या अटीसह तातडीने शाळा बांधून देण्यास होकार कळविला होता. त्यातून फाऊंडेशन आणि रोटरी यांच्या निधीमधून जिल्हा परिषद शाळा पुन्हा उभी राहिली. त्यांनी तब्बल 18 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला असताना आपणही काही वाटा उचलला पाहिजे यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी, शाळा सुधार समिती तसेच शिक्षणप्रेमींच्या प्रयत्नांतून ही देखणी वास्तू उभी राहिली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, रोटरी क्लबचे विरेन गोहिल, एम्पथी फाऊंडेशनचे सीईओ सुंदरेश्वर यांच्या हस्ते शुक्रवारी शाळेचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुषमा ठाकरे, पंचायत समिती सदस्य नरेश मसणे, सरपंच शिवाजी खारिक, उपसरपंच चिंता कोंडीलकर, गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, गट समन्वयक प्रदीप सुर्वे, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बांबळे, केंद्रप्रमुख अंकुश पाटील, शिक्षिका रंजना चौधरी,

ग्रामपंचायत सदस्य कांता निमणे, सदस्य दिनेश निमणे, महेश खरिक यांच्यासह डॉ. सुजाता कुलकर्णी, सतीश निमणे, शाळा सुधार समितीचे सदस्य, शेलू-बांधिवलीतील ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेत स्वतंत्र संगीत कला दालन बांधिवली ग्रामस्थ तुषार निमणे यांनी उभे केले. त्यांनी आपले आजोबा स्व. पुंडलिक निमणे यांच्या स्मरणार्थ शाळेला संगीत साहित्य भेट दिले. विद्यार्थ्यांना रायगडभूषण पुरस्कार गायक छगनबुवा निमणे तसेच चंदूबुवा निमणे हे स्वतः व गायक किशोर पाटील विद्यार्थ्यांना गायन आणि वादनाचे धडे देणार आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply