
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. रॅली नंतर महाविद्यालयामध्ये शहीद हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली, तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सेवा दलाचे सचिव अल्लाउद्दीन शेख यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना व तिचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी आपल्या मनोगतात, भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष, सार्वभौमत्व व लोकशाही मूल्यांवर आधारित भारतीय राज्यघटना हा देशाचा अनमोल ठेवा असून तरुणांनी तिचे महत्त्व लक्षात घेऊन जीवन जगावे, असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. ओ. परमार यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, इतिहास विभागप्रमुख डॉ. बी. के. भोसले, मराठी विभाग प्रमुख प्रा. एम. एम. कांबळे, तसेच इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. बी. एस. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. यू. टी. भंडारे, प्रा. नीलिमा तिदार, डॉ. बी. एस. पाटील, प्रा. खरात, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भाग्यश्री भगत व अपूर्वा ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी विशेष कौतुक केले.