
पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल सेक्टर 15मधील शांतिवन असोसिएशनच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची गेलेली पाण्याची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्या लाइनमधून 24 तासांत हजारो लिटर पाणी वाया जात असून त्यामुळे 35 वर्षांपूर्वीच्या बिल्डिंगला धोका असल्याची बातमी ‘रामप्रहर’ने प्रसिध्द केल्यावर नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सोमवारी त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्माचार्यांसह भेट देऊन पाहणी केली आणि दुरुस्तीबाबत सूचना दिल्या. या वेळी पाइपलाइनला भोके पाडल्याबद्दल रेल्वेच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली. नवीन पनवेलमध्ये सेक्टर 15मध्ये रेल्वे स्टेशनच्या बाजूला सिडकोची शांतिवन असोसिएशन आहे. या असोसिएशनच्या 10 क्रमांकाच्या बिल्डिंगच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मोठी पाण्याची पाइपलाइन गेली आहे. सदर पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने त्यामधून पाण्याचे फवारे उडत आहेत. या लाइनमधून 24 तास पाणी वाहत असते. हे पाणी सोसायटी मधील मैदानात साचून तेथे चिखल होत आहे. पाण्याच्या दाबाने जीर्ण झालेली पाइपलाइन फुटल्यास सिडकोच्या 35 वर्षांपूर्वीच्या या बिल्डिंगला आणि तेथील रहिवाशांच्या जीवाला धोका असल्याने याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दशोरे यांच्याकडे 22 फेब्रुवारी रोजी असोसिएशनचे अध्यक्ष काशीनाथ भोईर आणि पदाधिकार्यांनी भेट घेऊन लेखी तक्रार केली असता आठवडाभरात काम करू, असे त्यांनी सांगितले. पण त्यानंतर काहीच न करता जीर्ण झालेल्या पाइपलाइनला आम्ही किती ठिकाणी ठिगळ लावणार, असा सवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दशोरे यांनी विचारला होता. पाणीटंचाईची झळ नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असताना महिन्याला हजारो लिटर पाणी फुकट जात आहे. ते वाचवण्याबाबत अधिकारी उदासीन असल्याची बातमी प्रसिध्द होताच सोमवारी सकाळी पनवेल महापालिकेचे प्रभाग 20चे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांना फोन लावला असता त्यांनी दुरुस्ती विभागाचे कर्मचारी पाठवून त्याची पाहणी केली. या वेळी रेल्वेच्या ठेकेदाराचे कामगार पाइपलाइनला भोके पाडून पाणी चोरी करीत असल्याचे दिसून आले. यासाठी तेथील कंपाऊंडच्या संरक्षक भिंतीचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याचे दिसून आले. त्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी तेथील रहिवाशांनी सिडकोच्या सेक्टर 15मधील वसाहतीत पाणी कमी दाबाने आल्यास चौथ्या मजल्यापर्यंत पाणी येत नाही. त्यामुळे पिण्यासाठी विकत पाणी आणावे लागते. टँकर आणल्यास जमिनीत टाक्या नसल्याने तो खाली करता येणे शक्य नाही. त्यामुळे पाणी योग्य दाबाने सोडण्याची मागणी केली. नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत अधिकार्यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी शांतिवन असोसिएशनचे अध्यक्ष काशीनाथ भोईर, सेक्रेटरी अजित पावस्कर आणि अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे गोपाळ रेडकर उपस्थित होते.