पनवेल : वार्ताहर
गुढीपाडव्याप्रमाणेच चैत्र शुक्ल द्वितीयाला सिंधी नववर्षास प्रारंभ होतो. चैत्राचा चंद्र म्हणून या पर्वास चेटीचंड म्हणूनही संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान झुलेलाल यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने पनवेलमध्ये सिंधी समाज बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सिंधी पंचायत ट्रस्ट पनवेलच्या वतीने खास प्रभात फेरी काढून चेटीचंडचे महत्त्व वृद्धिंगत करण्यात आले. झुलेलाल मंदिरापासून रथयात्रा काढण्यात आली. बालाजी मंदिर, भाजी मार्केट पनवेल येथे प्रभात फेरीचा समारोप झाला. या वेळी ढोलताशांच्या गजरात सिंधी समाजाने नववर्षाचे स्वागत केले. कामोठे, खारघर, खांदेश्वर आदी विभागातून सिंधी लोक मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. झुलेलाल मंदिरात पूजा, भजन आणि इतर कार्यक्रमांसाठी भाविकांनी गर्दी केली होती.