Breaking News

आयुर्वेद सर्वांचाच

एखाद्या आयुर्वेदिक औषधाचा फॉर्म्युला, त्यातील घटक रसायनांचे प्रमाणीकरण, त्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम/दुष्परिणाम याची अचूक मांडणी आपल्याकडे अभावाने आढळते. आपल्याकडे प्राचीन काळी मौखिक परंपरेनेच औषधोपचारांची पद्धती एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिली जात होती. त्याला ग्रंथरूप मिळणे किंवा मिळाले तरी त्याचे जतन करून ठेवणे याच्या अभावामुळे आयुर्वेदाच्या प्रभावाबद्दल सुशिक्षितांमध्ये काही प्रमाणात अविश्वासाची भावना दिसते. परंतु म्हणून आयुर्वेद सपशेल नाकारणे ही आत्मवंचना ठरेल.

भारताला आयुर्वेदाची किमान पाच हजार वर्षे जुनी परंपरा आहे. ऋषीमुनींच्या तप:साधनेने, संशोधक वृत्तीने, काही बुद्धिमंतांनी पिढ्यानपिढ्या शोधलेल्या आणि जतन केलेल्या वनौषधींचे वरदान आपल्याला लाभले आहे. याउलट आधुनिक उपचार पद्धती भारतात आली, ती तुलनेने अगदी अलीकडे, दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी. त्याआधी भारतासारखा खंडप्राय देश फळला, फुलला आणि तंदुरुस्त राहिला त्यामागे आयुर्वेद आणि वनौषधींचेच भंडार होते. हा समृद्ध वारसा अनेक ग्रंथ आणि पोथ्यांच्या रूपाने अंशत: तरी आपल्या पिढीपर्यंत पोहोचला. कानामागून येऊन तिखट झालेल्या पाश्चात्य औषधोपचार पद्धती म्हणजेच अ‍ॅलोपथीने आल्या-आल्याच भारतीय जडीबुटींकडे पाहून नाके मुरडण्यास सुरूवात केली होती. आजही तीच परंपरा चालू आहे. अर्थात अ‍ॅलोपथीने आयुर्वेदाला नावे ठेवणे थोडेफार समजून घेण्याजोगे आहे. कारण अचूक संशोधन आणि त्यामागे असलेला शास्त्रोक्त प्रयोगशीलतेचा पाया यामुळे अ‍ॅलोपथी उपचारपद्धती अधिकाधिक विश्वासार्ह ठरत गेली. आयुर्वेदिक औषधांबाबत तितक्या ठामपणे दावे करता येत नाहीत. प्रसिद्ध योगगुरू व पतंजलि या स्वदेशी ब्रँडचे जनक बाबा रामदेव यांनी कोरोना प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधे बाजारात आणली. या औषधांच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे मंत्रीद्वय उपस्थित राहिले. आपले औषध जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेल्या कसोट्यांना उतरले असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला, तर कुठल्याही औषधास सरसकट मान्यता देण्यात आलेली नाही असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. या वादामध्ये डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी हे दोघे केंद्रीय मंत्री मात्र निष्कारण भरडून निघाले. बाबा रामदेव यांच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला मान्यता नसताना केंद्रातील मंत्री त्या औषधाची जाहीर भलामण कशी करू शकतात असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनने विचारला आहे. वास्तविक कुठल्या कार्यक्रमाला जायचे हा त्या मंत्र्याच्या मर्जीचा प्रश्न असतो. कुणीही देवदर्शनासाठी देवळात गेले म्हणून सदर व्यक्ती विज्ञानवादी नाही अशी सरसकट फुली मारणे चुकीचे ठरते. तसेच संपूर्ण आयुष्य वैज्ञानिक प्रयोगशाळेत काढणारा संशोधक अश्रद्धच असला पाहिजे असाही काही दंडक नाही. आयुर्वेदाचा मोठा वारसा लाभलेला असताना या प्रभावी औषधोपचार पद्धतीकडे हेतुपुरस्सर डोळेझांक करण्यात आली. पाश्चात्यांच्या अंधानुकरणात या ठेव्याचे इतकी वर्षे आपल्याला विस्मरण झाले होते. हा ठेवा पुन्हा एकदा उजेडात यावा किंबहुना जगाला देखील त्याचा लाभ मिळावा या सद्हेतूने केंद्रसरकारने आयुर्वेद आणि योगाभ्यास याला महत्त्व दिले आहे. यात विज्ञानवाद आणि परंपरावाद असा प्रश्नच उद्भवत नाही. आधुनिकतेची कास न सोडता आपल्या पुरातन शास्त्रांना नव्याने उजाळा द्यावा हाच खरा विकासाचा मार्ग ठरेल. आयुर्वेद हा सर्वांचाच आहे. त्याकडे दुजाभावाने पाहणे हा करंटेपणा आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply